‘ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी’ या वाक्याचा खरा अर्थ सामाजिक कामांत आल्यावर खरा कळला . अनुभव सारख्या दर्जेदार अंकात लेख वाचते काय , उत्सुकतेपोटी बीडला जाते काय आणि परत येतांना सख्खी वाटावी अशी नाती जोडून येते काय !
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची वाट दाखवून स्वप्ने पहाण्याची संधी देणारे हे दाम्पत्य , दिपक आणि कावेरी नागरगोजे .
आज आपली दिवसागणिक मोठी होत जाणारी धान्य बँक या जोडप्याच्या कामाच्या प्रेरणेतून जन्माला आली हे सांगताना खूप अभिमान वाटतो .

आयुष्यात दोनदा तरी असे झालाय कि असाहाय्य मनोरुग्ण रस्त्यात दिसूनही मी त्या जीवांना डावलून पुढे निघून गेले . हे आपल्यासारख्या अनेकांनी अनुभवले असेल . कारण बरेचदा कारण हेच असते कि अश्या प्रसंगी काय करावे याचे उत्तरच आपल्याकडे नसते . डॉ. भरत वाटवानी यांचे काम जेंव्हा वाचनात आले तेंव्हा यामुळेच असेल कदाचित नंबर संभाळून ठेवला . परत एक मनोरुग्ण मुलगी समोर आली . आता तिला डावलून पुढे जाणे गुन्हा होता कारण आता उत्तर माहित होते . ते उत्तर होते डॉ . वाटवानी सरांची ‘ श्रद्धा फाऊंडेशन’ . घरचा रस्ता विसरलेले , परतीचा रस्ता न सापडणारे मनोरुग्ण डॉक्टरांचे बोट धरून घरी परततात . या दैवी कामाची मी साक्षीदार बनले . मला भेटलेली ‘ ती ‘ उत्तरप्रदेशातील तिच्या घरी सुखरूप पोचली . मला नंतर ‘ती’ भेटतच राहिली कधी ओरीसा , कधी जलन्दर , तर कधी तमिळनाडूची . आता मात्र ठरवले काही काळ आपल्यातले सामान्यपण विसरायच आणि आणि या असामान्य लोकांसाठी काहीतरी आगळे वेगळे काम करायचे आणि उभी राहिली आपली साऱ्यांची धान्य बँक !
—– उज्वला बागवाडे, संस्थापक, वुई टुगेदर धान्य बँक ठाणे