धान्य बँक – एक अनोखी संकल्पना

नमस्कार
     वुई टुगेदर हा महिलांचा ग्रुप ‘धान्य बँक’ ही अनोखी संकल्पना गेल्या तीन वर्षांपासून ठाणे शहरात राबवित आहेत, ह्या मध्ये आता पुणे, नाशिक येथूनही काम सुरू आहे, साठ कार्यरत सभासद आहेत आणि हजाराहुन अधिक लोक ह्या मध्ये धान्य दान करीत आहेत.
    डिसेंबर २०१८ ला आपल्या धान्य बॅंकेस तीन वर्षे पूर्ण झाली. आपण धान्यबॅंकेद्वारे साधारण २७००० किलो धान्य सामाजिक संस्थाना देउन वंचितांच्या मुखी  घास भरवू शकलो.
      आपण काही संस्था दत्तक घेतल्या आहेत ज्यांना आपण नियमित धान्य व धान्यासाठी पैसे मदत करतो. शांतीवन बीड, दीपक नागरगोजे ह्यांची संस्था जी तमाशा कलावंत, ऊसतोड कामगारांच्या अनाथ मुलांसाठी काम करते, या प्रकल्पात आता ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ८० मुली प्रकल्पात निवासी आहेत. श्रद्धा फौंडेशन, डॉ भरत वाटवनी ह्यांची संस्था जी रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे काम करते, ह्या संस्थांना नियमित मदत करतो. ह्या व्यतिरिक्त आधार, शबरी, अस्तित्व इत्यादी संस्थांनाही आपण धान्य दिले आहे.
       एका छोट्याश्या  बीजाचे रोपट्यात रूपांतर होताना पाहून खूप आनंद आणि समाधान वाटतेय. आपण काही महिन्यापासुन  शाळांमध्येही आवाहन करत आहोत. उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लहानपणापासूनच विधायक कार्यासाठी त्यांचा हातभार लागतो आहें.
       आणखी आनंदाची बातमी म्हणजे पुणे आणि नाशिक येथे धान्य बॅंक सुरु झाली आहे, लवकरच इतर गावीही सुरु करण्यात येईल. आपल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करुयात. आपल्या मित्र मैत्रिणींना,नातेवाईकाना या सामिल करून घेउया.
     तुम्ही वर्षाचे फक्त एक हजार रुपये भरून आमच्या प्रकल्पात सामील होऊ शकता किंवा वाढदिवस, सण ह्यावेळी आपला आनंद धान्य वा पैसे देऊन वाटू शकता. रोख पैसे, चेक, ऑनलाइन ट्रान्स्फर आपल्याला सोयीची पद्धतीने आपण मदत करू शकता. सर्वांना सहज जमेल अशी आपली कार्यपद्धती आहे.

मी धान्य बँकेची सभासद आहे याचा मला अभिमान वाटतो, मला कुणासाठी काहीतरी करायला मिळते याचे समाधान आहे.

आपणही ह्या चांगल्या कार्यात सहभागी व्हाल ही खात्री आहे.

— ऋतुजा कुलकर्णी, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *