काही बायका जमल्या तर लागतात लगेच गप्पा करायला..
स्वैपाक, साड्या, धावपळ, पुन्हा माघारा, तोच गाडा ओढायला!
कितीही शिकली सवरली केली जरी नोकरी
तरी जेवण ही बनतेच बाईची जबाबदारी !
घरच्या सगळ्यांना बांधून द्यावी लागते तिला रोज शिदोरी.
सगळ्या व्यापातून वेळ काढून काय करू शकतात ह्या बायका?
बाहेर जाऊन सोशल वर्क करणे काय सोपे आहे का?
पण काही बायकांनी ठरवले आपले स्वैपाकघर आपण मोठे करायचे
जमून सगळ्यांनी धान्य जमा करायचे,
ज्यांना खरच गरज आहे, तिथे ते पोचवायचे.
कुणीच आपल्या अवतीभवती राहू नये भुकेले
याच एका ध्यासाने आम्ही आहोत झपाटलेले
एक एक करता करता आता चाळीस जमले
एकाच नाही, इतर गावातही सख्या शोधायचे ठरले
इवलेसे रोप आता मोठे करायचे आहे
आता पुढे पुढेच चालायचे आहे,
हाक मारली कुणी की धावून जायचे आहे,
बरोबर जास्तीत जास्त लोकांना घ्यायचे आहे.
स्वतःपुरती पोळीभाजी सगळेच बनवतात,
आपल्याला आपले स्वैपाकघर विस्तारायचे आहे
देशभर विस्तारायचे आहे!
— आरती भार्ज, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे