तरुण वयात माणसाने स्वप्न पहावे स्वतःच्या सुखी संसाराचे… नोकरी धंदा करून धडाक्यात खूप पैसे मिळवण्याचे, मजेत जगण्याचे!
पण एका तरुण जोडप्याने मात्र ठरवले दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याचे…स्वतःचा संसार सोडून जगाचा संसार करण्याचे, वंचितांचे भविष्य घडवण्याचे
ना ओळख ना पाळख, जे मूल आले त्याचे हे दोघे पालक झाले, ज्यांना जन्मदात्यांनी झिडकारले अशांना यांनी जीव लावले, मोठे केले
स्वतःच्या मिठभाकरीची पर्वा नाही पण त्या लेकरांना जेवू घातले, समाजाने मुलांना स्वीकारले नाही, तर आपणच शाळा उघडून बसले!
नुसतेच मुलांना आसरा देत नाहीत, त्यांच्या पायावर उभे करतात, शुष्क प्रदेशात हिरवा मळा पिकवतात, गावालाही नवजीवन देतात
काय म्हणावे ह्यांच्या ह्या वेडाला, शब्दच इथे अपुरे पडतात, ‘नागरगोज्यांच्या’ शेततळ्यात ‘राजहंस’ देखील तशाच वेडाने झुलतात!
बाबांच्या आनंदवनातून सेवेचे स्फुलिंग एका तरुणाच्या हृदयी उमटले, निरपेक्ष निरालस राहून माणसांबरोबर काम करण्याचे श्रमसंस्कार झाले,
मुलाचे स्वप्न आईनेही उराशी बाळगले, अथक परिश्रमाने शांतीवन फुलले, ज्योतीने ज्योत जागवली, अजून एका तरुण जोडप्याने सेवाश्रम उभारले
जरा अर्वीला येऊन बघा, संकटे झेलूनही हसणाऱ्या चेहऱ्याची इथे ददात नाही, अडचणी, खाचखळगे अनंत आहेत, पण दुःखाची ह्यांना पर्वाच नाही
कोवळी स्वप्ने आकार घेत आहेत, एक एक पाऊल पुढे जात आहे….कार्याची मशाल जळत राहू दे, वुईटुगेदर धान्यबँक तुमच्या पाठीशी आहे. नेहमी पाठीशी आहे.
— आरती भार्ज, वुईटुगेदर धान्यबँक ठाणे 3 फेब्रुवारी 2019